शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना यांच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. "गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्रपक्षाने केलं" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच "शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला आहे.
"भाजपाने संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा धसका घेतला आहे. याच कारण असं की, गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं" असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवलं. पण याच दरम्यान शिवसेनेने कोणाशी युती केली नाही" असंही म्हटलं आहे.
"अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज"
"उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे. कारण शेवटी ही शिवसेना टिकावी ही फक्त शिवसैनिकांची इच्छा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संभाजी बिग्रेडसोबत केलेली युती योग्य असून मी तिचं स्वागत करतो" असंही सांगितलं. यासोबतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे"
"शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक इतिहास आहे. 56 दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला, एक चिन्ह, एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असला तरी तो या देशाचा मान आणि शान आहे. त्यामुळे अशा मेळाव्याला विरोध होईल असं मला वाटत नाही. जर कोणी असा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.