ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र असून गरज पडल्यास भाजपची पहिली पसंती शिवसेनाच असेल असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो असे सांगत भाजपसोबत युती करण्यास आक्षेप नसल्याचे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन शिवसेना - भाजपची २५ वर्ष जूनी युती तुटली. निवडणूक प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दात भाजपवर टीकास्त्र सोडले होते. तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा उल्लेख उंदीर असा केला होता. मात्र मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे म्हटले आहे. त्यानंतर शिवसेना व भाजपमधील संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी आता वाद आणि कडवटपणा नको, आता महाराष्ट्राला स्थैर्य व शांतता हवी असे सूचक विधान केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही शिवसेना व भाजप नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत युतीची वेळ आल्यास शिवसेनेसोबत जाण्यास प्राधान्य देऊ असे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.