मुंबई : तुटीत असलेल्या बेस्ट उपक्रमात किमान एक लाख रुपये शिल्लक दाखवून मगच अर्थसंकल्प मंजूर करता येतो, अशी आजवरची प्रथा आहे. पण भाजपाच्या ताब्यात असलेल्या बेस्टची सत्य आर्थिक परिस्थिती निवडणुकीच्या काळात जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेनेने नवीन खेळी केली आहे. त्यानुसार बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या महासभेत फेटाळत अर्थसंकल्पात तूट दर्शविण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे बेस्ट समिती ताब्यात असलेल्या भाजपाची कोंडी झाली आहे. बेस्ट उपक्रमाचा सन २०१७-२०१८चा अर्थसंकल्प ५६० कोटी रुपये तुटीत आहे. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर तीन हजार कोटींवर पोहोचला आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पाला पालक संस्था असलेल्या महापालिकेच्या मंजुरीची आवश्यकता असते. तरीही नियमानुसार बेस्टला किमान एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प महासभेकडे सादर करणे बंधनकारक आहे. दरवर्षी हा तुटीचा अर्थसंकल्प निमूटपणे मान्य करणाऱ्या शिवसेनेने या वर्षी मात्र असहकार पुकारला आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक असल्याने महत्त्वाचे प्रस्ताव झटपट मंजूर करून घेण्याची शिवसेनेची घाई सुरू आहे. त्याचवेळी बेस्ट अर्थसंकल्प लटकावून भाजपाला शह देण्याची खेळी खेळली जात आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेकडून भाजपाची ‘बेस्ट’ कोंडी
By admin | Published: January 11, 2017 5:02 AM