लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. कधी विरोध तर कधी समर्थन अशी धरसोड भूमिका दिसून येत आहे. पाहणी, चर्चा आणि नंतर निर्णय अशा मार्गाने सेना या विषयाला हाताळत असून, महामार्गाला शेतकऱ्यांचा थेट विरोध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माळीवाडा आणि पळशी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी समृद्धी महामागाबाबत भूमिका स्पष्ट केली. सेनेचा विकासाला विरोध नाही. मुंबई, पुणे, वरळी सी-लिंक, उड्डाणपूल मुंबईत केले; परंतु शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी करून विकास नको आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे खाते शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश शिंदे यांना देणार काय? यावर ठाकरे यांनी ठोस उत्तर न दता मुख्यमंत्री, शिंदे व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक लावली जाईल, असे सांगितले.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी तरतूद केलेल्या १८ हजार कोटींपैकी ८ हजार कोटींचे रस्ते एमएसआरडीसीकडे वर्ग झाले. एमएसआरडीसी ते रस्ते द्विपदरीऐवजी चौपदरी करणार का? यावर ठाकरे म्हणाले, माझीदेखील हीच भूमिका आहे. बोलल्यानंतर मार्ग निघतील. काही शेतकरी जमीन न देण्याच्या भूमिकेत आहेत. काहींना मोबदला जास्तीचा हवा आहे. आम्ही विरोधात दंड थोपटतो, नंतर शेतकऱ्यांची मानसिकता बदलते. त्यामुळे आधी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. आहे तो रस्ता रुंद करून दिला तर चालेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्ग होऊ नये, ही शेतकऱ्यांची मागणी नाही. सुपीक जमीन न जाता मार्ग व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आह, असे ठाकरे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना संभ्रमात!
By admin | Published: June 27, 2017 1:34 AM