ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - शिवसेना नगरसेविकांनी भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मारहाण केली आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात लागू झालेल्या जीएसटीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेचा पहिला धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे 647.34 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आणखी वाचा -
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी ""मोदी- मोदी"" अशी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली होती, तर या प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ""चोर है-चोर है"", अशी नारेबाजी दिली. दरम्यान शिवसेना नगरसेविकांनी भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाणीनंतर पालिकेच्या दालनात भाजपा नगरसेवकांची बैठक सुरु झाली आहे. शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी मात्र बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले म्हणून मारहाण केल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र माझ्यासमोर मारहाण झाली नसल्याचं सांगत यावर बोलणं टाळलं.
विशेष म्हणजे हे सर्व सुरु होतं तेव्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याने, दोन्ही नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. उद्धव ठाकरे भाषणाला उठताच काही भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला. एकूणच राज्यातील सत्तेत एकत्र नांदत असणारे शिवसेना-भाजपा या दोस्तांमध्ये कोणत्या-न्-कोणत्या कारणावरुन नेहमीच कुस्ती सुरू असते.
https://www.dailymotion.com/video/x845736
देशभरात लागू जीएसटी कर प्रणाली
1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत.
जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले.