Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं.
लोकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून मला आजही मी मुख्यमंत्री आहे असं वाटतं, असं काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बोलले होते. त्या विधानाचा खरपूस समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला. "मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं म्हणू लागलेत. आता तुम्ही बसा तिकडेच'', असा जोरदार टोला ठाकरेंनी लगावला.
अजून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झालेला नाहीतुम्ही (देवेंद्र फडणवीस) दिलेला शब्द पाळला असता तर आजही तुम्हीच मुख्यमंत्री असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शब्द पाळला नाही. पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मी बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण झालेलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असा शब्द मी बाळासाहेबांना दिलेला होता. तो अद्याप पूर्ण करायचा आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवायचं आहे. बाळासाहेबांना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.
...तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो"मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.