मुंबई - शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Shivsena Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. अहो केसरकर किती बोलता शरद पवारांविरुद्ध... एकेकाळी शरद पवारांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच २०१४ला मीच साहेबांचा निरोप घेऊन आलो होतो. जिथे आहात तिथे सुखी राहा, असं म्हणत खाजवून खरूज काढू नका, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.
दीपक केसरकरांनी आता जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्हीही राबराब राबतो. आमचंही मतदार संघात गुडविल असतं. मला जी सीट तुम्ही दिली होती, त्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार हा दोन वेळा पडला होता असं असताना ताटामध्ये कोण थुंकलं? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का मला?" असा संतप्त सवाल दीपक केसरकरांनी केला आहे. तसेच "आव्हाड वाईट शब्दांत बोलले, सीट देऊन कोणी माझ्यावर उपकार केले नाहीत. दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला होता. ती सीट मला दिली. मी 25 हजार मतांनी निवडून आलो होतो."
"लोकांमध्ये आमचंही गुडविल असतं. आमच्या वाडवडिलांनी दानधर्म केलेला असतो. आम्ही राबराब राबतो आणि तुम्ही काहीही म्हणायचं? ताटामध्ये कोण थुंकला? तुमच्या ताटामध्ये काय जेवायला घातलं का मला?" असं दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी याआधी केला होता.
बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला होता.