Deepali Sayed : "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:47 PM2022-06-17T13:47:12+5:302022-06-17T13:56:54+5:30
Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई - देहू संस्थान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र पंतप्रधान यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचं भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आंमंत्रित करण्यात आलं. पवार यांना भाषणासाठी नाकारण्यात आलं. ज्यानंतर पवार काही न बोलताच बसून राहिलेत. पंतप्रधान यांनी पवार यांच्या भाषणाची आठवण मंचावर करून दिली. मात्र स्वाभिमानाखातर पवार यांनी बोलण्यास नकार दिला. यावर आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी भाष्य केलं आहे.
"चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचे नाव गायब झाले कसे?" असं म्हणत दीपाली सय्यद यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर (BJP Chandrakant Patil) जोरदार निशाणा साधला आहे. तसेच "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचे नाव गायब झाले कसे? स्थानिक प्रतिनिधींचे पासेस कुठे? तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनिधींना अशी वागणूक का? मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत. PMO ने माफी मागा, ही भाजपाची सभा नव्हे. जनतेला उत्तर द्या!" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतुन अजितदादांचे नाव गायब झाले कसे?स्थानिक प्रतिनीधींचे पासेस कुठे?तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनीधींना अशीवागणुक का? मोदींच्या बोलण्याने देशचालत नाहीआणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत.PMO ने माफी मागा हिभाजपाची सभा नव्हे जनतेला उत्तर द्या!
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022
नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेल्या अजित पवार यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली. त्यानंतर भाजपाने राष्ट्रवादीच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. तसेच, देहूतील कार्यक्रम हा सरकारी नसून खासगी होता, असेही भाजपाने म्हटले आहे.
देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. याशिवाय स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला, असे भाजपने अधिकृतपणे सांगितले आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही, अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादी समर्थकांना टोलाही लगावला आहे.