Deepak Kesarkar Press Conference: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुमारे १५ ते २० आमदारांनी सुरूवातीला सुरत येथे ठाण मांडले आणि शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच भाजपासोबत पुन्हा नैसर्गिक युती करून नवीन सरकार स्थापन करण्याचीही मागणी केली. हा विचार पटल्याने हळूहळू शिंदे गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली आणि आता सुमारे ३८ आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यापैकी, दीपक केसरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितलेलाच नाही, याचीही त्यांनी साऱ्यांना आठवण करून दिली.
"आमची मनं साफ आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही विनंती केली होती की शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. ते म्हणतात, मी राजीनामा देतो. राजीनामा कुणी मागितलेला नाही. त्यांना भावनिक वळण द्यायचं आहे. ते नेते आहेत. बाळासाहेबांनंतर त्यांनी पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात, एवढीच अपेक्षा आहे", असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, "उद्धव ठाकरे यांना आम्ही सुरूवातील भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता. मी स्वत: उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. पाच सीनिअर मंत्रीही भेटले होते. त्यामुळे मला वाटतं की अजूनही त्यांनी आमच्या मागणीवर विचार करावा", असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेतील इतर मुद्दे-
>> उद्धव ठाकरे प्रत्येकाला समजून घेतात, पण निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात, त्यात नाराजी वाढते. >> संघटना कोणीच तोडत नाही. आम्ही त्याच संघटनेचे सदस्य होतो, आहोत आणि राहू.>> मी आमच्याच नेतेमंडळींवर काही आरोप करणार नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.>> आमच्यापैकी कुणीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही.>> आदित्य ठाकरे आमच्यासोबत जेव्हा बसमध्ये होते. त्यांनाही आम्ही सगळं समजावून सांगितलं होते. >> शिवसेना आणि भाजपा एकत्रच राहिलं पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगतोय.>> पंतप्रधानांना विशेष प्रेम शिवसेनेबदद्ल आणि बाळासाहेबांबद्दल आहे.>> कोणाच्याच नावाने मतं मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते.>> उमेदवारा देखील कामं करतात त्यामुळे त्यांचेही मूल्य जनतेत असते.>> केवळ पक्षाचं ठराविक मतदान नसतं.>> आजच्या विधानसभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात कारण ते लोक मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम करतात.