मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. या ४० आमदारांच्या बॉड्या इथे येतील. त्यांना डायरेक्ट शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी. हे जिथे थांबले त्या गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागरूक मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठविले आहेत, द्या बळी. शिवसेनेच्या विरोधात कट-कारस्थान सुरू आहे. त्यावर लढा देत मात करू. अरे तुम्ही काय शिवसेनेशी लढणार? मेले तुम्ही अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला होता. याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"कामाख्या देवीने आता कोणाचा बळी घेतला?" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे. "कामाख्या देवीने आता कोणाचा बळी घेतला. ४० रेडे पाठवले पण जो बोलला तो रेडा आम्हाला नको. सहन करण्याची पण काही सीमा असते. आम्ही रडत होतो" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. "शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचंही ते म्हणाले.
"शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो तरी चालेल पण आता मागे हटणार नाही"
"स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी 50 आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या 50 लोकांचा. आपण हे मिशन सुरू केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही. सुनील प्रभू यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही" असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा विश्वास आहे. एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.