सांगली : राज्य शासनाने भू-विकास बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य भू-विकास कर्मचारी संघटनेने संताप व्यक्त केला असून, शिवसेनेचे खासदार आनंदराव आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत दादर येथे होणाऱ्या बैठकीत सरकार विरोधी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. याबाबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही साकडे घातले जाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या १२ मे रोजीच्या बैठकीत भू-विकास बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘भू-विकास’च्या राज्यातील २९ जिल्हा शाखा आणि एक शिखर बँक अस्तित्वात आहे. याशिवाय उपशाखांचीही संख्या मोठी आहे. भू-विकास बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला मोबदला देऊन बँकांचा हिशेब केला जाईल, असा निर्णय घेतला असला तरी, कर्मचारी संघटनेस सरकारची ही भूमिका पटलेली नाही. आनंदराव आडसूळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ‘भू-विकास’ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यापुढील आंदोलनातही त्यांनी कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे. या बैठकीला राज्य सहकारी भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.भूमिका का बदलली?आघाडी सरकारच्या कालावधीत भू-विकास बँकांच्या प्रश्नावर भाजपाचे सर्व प्रमुख नेते आमच्याबरोबर होते. सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्याच धोरणावर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका त्यांनी का घेतली? भू-विकास बँकांच्या पुनरुज्जीवनाची भूमिका बदलून त्या बंद करण्याची भूमिका त्यांनी का स्वीकारली? सरकारच्या या भूमिकेबद्दल कर्मचारी संघटनेत तीव्र नाराजी आहे, असे कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील म्हणाले.
शिवसेना भू-विकास बॅँकेच्या बंदीविरोधात मैदानात!
By admin | Published: May 19, 2015 1:43 AM