मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (BJP Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. यावरून आता शिवसेनेने अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
"कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय, कोणाचे बोके पळवतंय हे सर्वांना दिसतंय" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवताय आम्ही जमिनीवरच आहोत. तुम्हीच आसमानात आहात त्यांना आम्ही जमिनीवर आणू असंही म्हटलं आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित शहांवर टीकास्त्र सोडलं आहे. धोके कोण कोणाला देतं हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे असं म्हटलं आहे.
"तुम्हीच आसमानात आहात आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू"
किशोरी पेडणेकर यांनी "मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पहिले शाखाप्रमुख भेटतात, नगरसेवक आपापले काम करत आहेत. कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय, कोणाचे बोके पळवतंय हे दिसतंय. तुमचे मनसुबे सर्वांना कळाले आहेत. स्थानिक पक्षाला नेस्तनाबूत करून एकच पक्ष... हेच मनसुबे आहेत. तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवताय... आम्ही जमिनीवरच आहोत. तुम्हीच आसमानात आहात आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू"
शिवसेनेने "ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू" असा पलटवार केला आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Shivsena Chandrakant Khaire) यांनी "उद्धव ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही. शिवसेनाला कोणीच संपवू शकलं नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू. अमित शाह यांनीच शब्द फिरवला. शाह यांच्यासारख्या व्यक्तीने खोटं बोलणं चुकीचं" असं म्हणत निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.