मुंबई - राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, शिवसेनेतील गळती काही केल्या थांबताना दिसत नाही. शिवसेनेसह युवासेनेतीलही पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. असं असतानात आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खोचक टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे सोडून गेले, हाच मोठा गौप्यस्फोट आहे. आता आणखी काय स्फोट करणार आहेत, काय बोलायचं ते बोलू देत, असं किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपू दे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा असंही सांगितलं. पेडणेकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचच हे फळ आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. किशोरी पेडणेकर यांच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
"भाजपाला जे पाहिजे, ते देण्याची कृपा करू नका"
"तुमच्या जाण्यानेच मोठा गौप्यस्फोट झाला. यापेक्षा अजून काय स्फोट करणार… भाजपाला जे पाहिजे, ते देण्याची कृपा करू नका. काय बोलायचे ते बोलू देत. मग जनता ठरवेल, स्फोट आहे की आणखी काही आहे…" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. यासोबतच "माझी नुकतीच उपनेतेपदी निवड झाली. प्रामाणिकपणे काम केल्याचं फळ आहे. काम करताना निष्ठेने केलं तर फळ मिळतं. सामान्य कुटुंबातील महिलेची असामान्य संघटनेच्या उपनेतेपदी निवड झाली. तुम्ही दाखवलेला हा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल" असंही सांगितलं.
"हे जे शुक्लकाष्ट शिवसेनेच्या मागे लागलंय त्याचा लवकर निकाल लागावा"
शिवसेनेवर आलेलं हे संकट दूर होण्याची प्रार्थना किशोरी पेडणेकर यांनी गणपतीच्या चरणी केली. "हे जे काही शुक्लकाष्ट शिवसेनेच्या मागे लागलं आहे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा. जनतेच्या मनातही धाकधूक, राग, द्वेष आहे, तो संपू देत. दोन वर्षांनी सर्वजण मोकळा श्वास घेत आहेत. आपला सर्वांचा लाडका बाप्पा आहे. घरी पाहुणे, मित्रमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी येत आहेत. सगळं देणारा हा देव आहे. सर्वांचं भलं, कल्याण कर अशी मी प्रार्थना करते" असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.