मुंबई: शिवसेनेने भाजपसोबत असलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासून भाजप सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आले आहे. यासोबतच शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरुन सध्या रज्यात राण पेटलंय. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे, दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह देण्यात आले आहे. या गोंधळात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आजतकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुजरातच्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडण्यावरुन भाजप आणि गुजरात सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना सोडल्याचा उल्लेख केल्यानंतर, शिवसेना धर्मनिरपेक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी आजोबांकडून जे हिंदुत्व शिकलो, त्यात बलात्कार करणाऱ्याची आरती-पूजा केली जात नाही. जो बलात्कारी असेल, त्याला फाशीच द्यायला हवी, हे माझ्या आजोबांचे हिंदुत्व होते. मग तो कोणत्याही धर्माचा असो. बलात्काऱ्याचा धर्म, प्रांत, जात, भाषा न पाहता फाशी द्यावी,' अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.
'आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे'ते पुढे म्हणतात की, 'आमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल, तर आम्ही त्याविरोधात उभे राहू. पण, आमचा धर्म सर्वांची सेवा करा, सर्वांना सोबत घेऊन चाला, हेच शिकवतो. हिंदुत्वाचा विचार केला तर, उद्धव ठाकरे यांनी जितके वेळेस अयोध्येला भेट दिली, तितकी क्वचितच संपूर्ण देशातील कोणीही भेट दिली असेल. आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे. आम्ही औरंगाबादचे नाव बदलले, उस्मानाबादचे नाव बदलले तेव्हा हिंसाचार झाला नाही. हे आमच्या हिंदुत्वात आम्ही द्वेष पसरवत नाही.'
'गद्दारांना पुन्हा जागा नाही'उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढणार की, पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करणार की, शिंदे गटासोबत लढवणार? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गद्दारांना पुन्हा जागा दिली जाणार नाही. त्यांच्या जागेवर, ते निवडून येतील का, हा प्रश्न त्यांना विचारयाल हवा. अनेकांनी आता निवृत्तीची योजना तयार केली आहे. कोणासोबत निवडणूक लढवायची, हा निर्णय वरिष्ठ घेतील,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.