परभणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामधून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला खरमरीत टोला लगावला आहे. ते परभणीत माध्यमांशी बोलत होते.
'संपलेल्या पक्षावर बोलत नाही'आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणं बाकी आहे, त्यासाठी पत्र लिहिलं तर बरं होईल. त्यांनी(राज ठाकरे) राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
'आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही' दरम्यान, आदित्य ठाकरे काल नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. "आजकाल आम्हाला धर्म-हिंदूत्व शिकविले जाते. परंतु कुणीही आम्हाला ते शिकविण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवा हा आहे. तर प्राण जाये पर वचन ना जाये, हे आमचे हिंदूत्व आहे. धर्माचे पालन करुन जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत. ते पूर्ण करुन दाखविणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणालेह होते.
'महाविकास आघाडीमध्ये बेस्ट ऑफ ऑल'नांदेडमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे कौतुक केले. "देशाची क्रिकेटची टीम तयार करताना जसे सर्वात्तम बॅटसमन, बॉलर, फिल्डरची निवड करण्यात येते. तशाच प्रकारे महाविकास आघाडीतील सहभागी सर्व जण हे बेस्ट ऑफ ऑल आहेत. सर्वोत्तम लोकांमुळेच राज्यात आता विकासाचा वेग वाढला आहे. विकास काय असतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, नवा महाराष्ट्र घडल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते म्हणाले होते.