मुंबई: शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची 'शिवसंवाद' यात्रा सुरू आहे. या यात्रेत ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. सध्या ही मनमाडमध्ये आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर टीका केली.
केसरकर म्हणतात की, 'आता शिवसैनिक दूर गेले म्हणून यांनी यात्रा सुरू केल्या आहेत. याआधी अशाप्रकारच्या भेटी-बैठका कधी घेतल्या नाही. त्या घेतल्या असत्या तर आज ही वेळ आलीच नसती. आता हे वेगवेगळ्या यात्रा काढत आहेत. आदित्य तरुण आहेत, कसे वागावे बोलावे याचे उद्धव ठाकरेंकडून त्यांनी शिकावं,' असा सल्ला केसरकरांनी यावेळी आदित्य यांना दिला.
ते पुढे म्हणाले की, 'आदित्य ठाकरे निम्म्या वयाचे आहे. मात्र, ते आले की आम्ही खुर्चीवरुन उठतो कारण त्यांच्या आजोबांना आम्ही मान देतो. तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून शिवसैनिक आहात. पण, आमच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली आहे. कट्टर शिवसैनिकांची बदनामी कशाला करता. या नेत्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचलंय. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली, त्यांचा अपमान मनाला लागतोय.