सावंतवाडी : अजूनही वेळ गेलेली नाही. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी विचारपूर्वक आपला निर्णय मागे घ्यावा, त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा मोठ्या मनाने माफ करतील, मात्र तसे न झाल्यास आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असून आता शिवसैनिक मागे हटणार नाही लढणारा आहे.असा इशारा शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सोमवारी शिवसेने कडून रॅलीचे आयोजन केले असून त्या पाश्र्वभूमीवर रविवारी येथील आरपीडी काॅलेज च्या सभागृहात बैठक पार पडली यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार,गुणाजी गावडे,योगेश नाईक,प्रतिक बांदेकर,विशाल सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.केसरकर यांना सगळी कडेच दहशतवाद कसा दिसतो ते जातील तिथे दहशतवादाचीच भाषा करतात. त्यांचा तो निवडणुका जिंकायचा एक पॅटर्नच बनला आहे.पण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असून ती तुम्हाला वेळोवेळी दिसेल त्यामुळे शिवसैनिकांनी घाबरण्याचे कारण नाही.असे आश्वासन पारकर यांनी दिले.
केसरकर यांनी आपली भुमिका बदलून पुन्हा शिवसेनेत यावेत असे आवाहन करतानाच पारकर यांनी पक्षांकडून केसरकरांना मंत्रीपद दिले. तसेच विविध पदे देखील दिली त्याची त्यांनी जाण ठेवली.बंडखोरी करणे हे लांच्छनास्पद आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्री बनवलं. त्यांच्या विरोधातच आपली ते भूमिका मांडत आहे. केसरकरांना मतदार संघातील विकास कामांसाठी मिळालेला निधी हा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळत होता. याची त्यांनी जाण ठेवावी, असा त्यांनी सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
केसरकर शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा उद्रेक हा होतच राहील. त्यामुळे दहशतवादाचा आरोप करून त्यांनी शिवसैनिकांना आणखीन भडकवू नये, असे ते म्हणाले. तर केसरकरांनी आपला निर्णय मागे न घेतल्यास जशास तसे शिवसैनिक त्यांना उत्तर देतील. आम्ही नवा चेहरा मतदार संघात निर्माण करून शिवसेनेच्या चिन्हावर त्याला निवडून आणू, असेही पारकर म्हणले.
सोमवारी सावंतवाडीत रॅलीचे आयोजन सोमवारी सावंतवाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार असून ती रॅली गवळी तिट्टा ते बापूसाहेब महाराज पुतळा अशी असणार आहे.त्यासाठी पोलीस परवानगी मागितली असून परवानगी मिळाली नाही तरी रोजी काढण्यात येणार असे पारकर म्हणाले.