मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टीकेला आता शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'केंद्र सरकार आणि गुजरातने महाराष्ट्रातील उद्योग पळवणे बंद करावे', असा हल्लाबोल सुभाष देसाईंनी केला आहे.
आज सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. 'राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, अस शहा म्हणाले होते. पण, आधी राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातो. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही उद्योगांची पळवापळवी झाली. ते गप्प बसले, आम्ही गप्प बसणार नाही', असा इशारा देसाई यांनी दिला.
महाराष्ट्राला फक्त दोनच मेडिकल कॉलेज देसाई पुढे म्हणाले, भाजपच्या काळात राज्यासाठी केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर झाले. यूपीला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता युपीला 2700 कोटी व महाराष्ट्राला फक्त 263 कोटी दिले गेले. सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसीवर दिल्या. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला तात्काळ मंजूरी द्या, असं सांगतानाच तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय, असंही देसाई म्हणाले.
अनेक संस्था राज्यातून हलवल्याकोरोना काळात आम्ही 2 लाख कोटी रुपये आणले. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.