मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे नसते, तर ते संगीतकार म्हणून दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे नवनियुक्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. नाशिकमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचे सरनेम, यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपासह मनसेवर हल्लाबोल केला. दरम्यान, काल झालेल्या खातेवाटपादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपद देण्यात आले आहे.
मला पक्षाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले याचा मला आनंद आहे. पाणी हा विषय राज्यातील सर्व नागरिकांशी निगडीत आहे. त्यामुळे मी या खात्याचा मंत्री म्हणून अधिकाधिक चांगले काम करायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांसह प्रत्येक गावात पाणी पोहचविण्यावर माझा भर असेल, असे गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सांगितले.