जळगाव – कोरोना काळ बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर सध्या लग्नसराईचं वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापाठोपाठ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. गुलाबराव पाटील यांचा लहान मुलगा विक्रम सोमवारी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या लग्नाची धामधुम पाटील कुटुंबात पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांची होणारी सून ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे शेतकऱ्याची पोर मंत्र्यांची सून होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. गुलाबराव पाटील हे शेतकरी कुटुंबात जन्मले असून कुठलाही बडेजाव न आणता त्यांनी विक्रमचं लग्न सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीशी जुळवलं आहे. चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा हिच्यासोबत विक्रम पाटील यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
भगवान पाटील हे यात्रा कंपनीत लेबर कंत्राटदार म्हणून काम करतात तसं घरची शेतीसुद्धा सांभाळतात. पाळधी येथील साईबाबा मंदिरात गुलाबराव पाटलांच्या मुलाचा विवाह सोहळा होणार आहे. कोरोना काळ असल्याने अगदी साध्या पद्धतीनेच विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
लेकीच्या संगीत कार्यक्रमात संजय राऊत थिरकले
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. राऊत यांच्या कन्या पूर्वश्री २९ नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत. मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूर्वश्री राऊत यांचा विवाह सोमवारी संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला बडे नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी डान्स केला. सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील डान्स करण्याचा आग्रह केला. त्यानंतर मिस्टर आणि मिसेस राऊत गाण्यावर थिरकले.