कोल्हापूर : राज्यातील सत्ता टिकविण्यापुरताच शिवसेनेच्या आमदारांचा सध्या राज्यात वापर सुरु असून भाजप मंत्री त्यांना किंमत देत नाहीत, अशी सल मुंबईत बुधवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त झाली. विधानभवनातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनात ही बैठक झाली. शिवसेनेने विभागांसाठी नेमलेले प्रतोद यांच्यासह प्रमुख मोजकेच आमदार या बैठकीस उपस्थित होते.केवळ नाराजी व्यक्त होवून आमदार तिथेच थांबले नाहीत. त्यांनी तातडीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बैठकीतूनच फोन लावला. त्यांच्या कानांवर ही नाराजी घालण्यात आली. येत्या चार दिवसांत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही नाराजी व्यक्त करण्याचा व पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आमदारांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. पालकमंत्र्यांकडून मागितलेला निधी दिला जात नाही. कोणत्याही जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नवीन घोषणा अथवा निधी वितरित करायचा झाल्यास त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारास बोलवून त्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जातो. हे आम्ही आणखी किती दिवस सहन करायचे, अशी संतप्त भावना या बैठकीत व्यक्त झाली.भाजप मंत्र्यांच्या या आडवणूकीमुळे यापुढील काळात शिवसेना आमदारांना निवडणुका लढविणे अवघड होणार असल्याची भीती व्यक्त झाली. जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आमदाराने प्रशासकीय अधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्याची मागणी केल्यास त्यानुसार भाजपचे पालकमंत्री नियुक्ती करत नाहीत. याउलट भाजपच्या आमदाराने मागणी केलेल्या अधिकाऱ्याची मात्र तातडीने नियुक्ती होते. त्यातून लोकांत शिवसेनेच्या आमदारांकडून कामे होत नसल्याचा मेसेज जात असल्याच्या भावना व्यक्त झाल्या. (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांकडूनही सापत्नभावबजेट वाटपातही स्वत: मुख्यमंत्री व अर्थमंत्रीच हे भाजपच्या आमदारांना झुकते माप देवून निधी देतात, जेणेकरून त्यांना पुढील विधानसभेला राजकीय फायदा होईल. याउलट शिवसेना आमदारांना मात्र वारंवार मागूनही निधी दिला जात नाही, अशीही तक्रार बैठकीत करण्यात आली. स्फोटाची भाषाया तक्रारींची भाजपने गांभार्याने दखल न घेतल्यास आगामी काळात राजकीय स्फोट घडवून आणण्याची भाषाही बैठकीत करण्यात आली.
शिवसेना आमदारांत वाढतेय खदखद!
By admin | Published: July 21, 2016 5:03 AM