ऑनलाइन लोकमत
महिलांसाठी आरक्षित दादर, शिवाजी पार्क प्रभागात आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या संदीप देशपांडे यांना हा पराभव जिव्हारी लागला. यामुळे त्यांनी शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंट बंद करण्याची घोषणा केली. मात्र, यावरून चांगलेच राजकारण तापले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण ‘सेल्फी पॉइंट’ आणखी आकर्षक करणार असल्याचे ‘टिष्ट्वट’ करून जाहीर केले, तर शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नवीन कलाकृतींसह ‘सेल्फी पॉइंट’ सुशोभित करणार असल्याचे जागोजागी फलक लावले. यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन, ‘सेल्फी पॉइंट’ पुन्हा सुरू करण्याचे आदेश देशपांडे यांना दिले. तोपर्यंत भाजपाने आयुक्तांमार्फत ‘सेल्फी पॉइंट’ बनविण्याची परवानगी मिळवली. या ‘सेल्फिश’ घडामोडींची दखल घेऊन जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दादरमधील ‘सेल्फी पॉइंट’च्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे, शिवसेना आणि भाजपा या पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत तिन्ही पक्षांना ‘सेल्फी पॉइंट’साठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवाजी पार्क परिसराला, यापुढे ‘सेल्फी पॉइंट’चा वेढा पडल्याचे पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पक्षाने ५० फुटांच्या अंतरावर ‘सेल्फी पॉइंट’ उभारा, अशी सूचना पालिका प्रशासनाने या सर्व राजकीय पक्षांना केली आहे. येथे असतील ‘सेल्फी पॉइंट’शिवाजी पार्कवर मनसेच्या मूळ जागेतच ‘सेल्फी पॉइंट’ सुरू ठेवता येईल, तर भाजपाला त्यापासून थोड्या अंतरावर जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेला स्काउट पेव्हेलियनच्या बाहेर जागा देण्यात आली आहे.