नागपूर : हिंदू मंदिरांचे सरकारीकरणाचा डाव हिंदू समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे आहे. भ्रष्टाचाराची कारणे दाखवून मंदिरे सरकारजमा केली जात आहे. या सरकारीकरणानंतर मंदिर व्यवस्थापनातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शिवाय, निधर्मी शासनव्यवस्थेने केवळ हिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याची कृती संविधानातील समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारी असल्याचे सांगत, शिवसेना आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. मंदिरांचे सरकारीकरण रद्द झाले नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदारांनी दिला.शिवसेना आमदार भरत गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश फातर्पेकर, बालाजी किणीकर, अमित घोडा, शांताराम मोरे, राजाभाऊ वाजे, प्रकाश सुर्वे, जयप्रकाश मुंदडा, वैभव नाईक, प्रकाश आबीटकर, राजेश क्षीरसागर आदींनी विधानभवन प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करत मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध केला. शनी मंदिराचे सरकारीकरण रद्द झालेच पाहिजे, मशीद, चर्चला वगळून हिंदू मंदिरांचे सरकारीकरण करणाºया सरकारचा निषेध असो, मंदिरात भ्रष्टाचार करणाºयांवर कारवाई करा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.खोटी कारणे सांगून मंदिरे हडपण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर येथे शासकीय समित्यांनी केलेला भ्रष्टाचार विधिमंडळात उघड करूनही त्यावर कारवाई केली जात नाही. उलट दोषींना पाठीशी घातले जात आहे, असे सांगून त्यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध दर्शविला.
हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाविरुद्ध शिवसेनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:28 AM