अहमदनगर : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुल प्रकल्पावरुन महापालिकेच्या सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या घरकुल प्रकल्पाच्या इमारतीला महापालिकेने पूर्णत्त्वाचा दाखलाच दिलेला नाही. शिवाय सहा महिने झाले तरी वीज आणि पाण्याची सुविधा दिलेली नाही. अशा अनधिकृत व अपूर्ण प्रकल्पाचे खा. सुप्रिया सुळे यांच्या हातून लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी महापालिकेच्या सभेत केला. त्यानंतर सभेत शिवसेना-राष्ट्रवादीचे सदस्य एकमेकांना भिडले. राष्ट्रवादीचे अभिषेक कळकर महापौर असताना सहा महिन्यांपूर्वी नगरमध्ये घरकुल प्रकल्पात ३७२ कुटुंबांना घरे देण्यात आली. हा कार्यक्रम अत्यंत घाईघाईने उरकण्यात आला. त्यावेळी या इमारतीला पूर्णत्त्वाचा दाखला दिलेला नव्हता. तसेच अद्यापही सदरचा दाखला मिळालेला नाही. असे असताना लाभार्थ्यांना त्यावेळी घराच्या चाव्या कशा दिल्या? असा सवाल सातपुते यांनी केला. बेघरांना घरे दिली त्यांची निवासस्थाने एक प्रकारे बेकायदेशीरच आहेत. अशा इमारतीचे खा. सुळे यांनी लोकार्पण केल्याने त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप सातपुते यांनी करताच सभेत गोंधळ घातला. (प्रतिनिधी)
अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी भिडली
By admin | Published: December 23, 2016 4:39 AM