मुंबई / पुणे - विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. "वर्षानुवर्षे मतदारांचा विश्वास हा भाजपावर होता त्यांचा विश्वास आपण का गमावला याचा विचार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन्ही मतदारसंघांत त्यांनी करावा. पण तो न करता केवळ शिवसेनेबद्दलच्या द्वेष भावनांनी टीका केली जात आहे. शिवसेनेने एकटे लढले पाहिजे असे वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत."
"भाजपाची विधानपरिषदेच्या निवडणुकीत स्वतःचे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणं ही केविलवाणी धडपड आहे. यात काहीच शंका नाही" असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि संपूर्ण महाविकास आघाडी सरकारवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळेच आमचा हुरुप वाढलेला आहे. एक वर्ष पूर्ण झालं त्याच्या निमित्ताने एक चांगली भेट मिळालेली आहे" असंही त्या म्हणाल्या आहेत.
"मुंबई, पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारची घोडदौड चालू राहील अशी मला खात्री वाटते. आमच्या नेतेमंडळींनी पुढच्या वाटचालीबद्दल तसेच निवडणूक कशी लढायची याबद्दल भूमिका घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि अनेक इतर घटकांनी आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल मनापासून आभार. विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन" असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.