मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन केले.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, 'आज अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचे नाव मिळाले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही एकनाथ शिंदेंचे अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो, जुनी शिवसेना हीच आहे. ही विचारांची शिवसेना आहे आणि हाच विचार पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत. म्हणून कुणीही खासगी मालमत्ता म्हणून पक्षावर दावा सांगू शकत नाही.'
'आम्हाला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता. यापूर्वीच्या अनेक निर्णयामध्ये विविध पक्षांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली होती, तेव्हाही आयोगाने अशाच प्रकारचा निर्णय दिला आहे. आमदार खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेला आहे. एखाद्या पक्षाची ओळख त्या पक्षाला मिळालेल्या व्होट पर्संटेजवर असते. आणि व्होट पर्संटेज आमदार खासदारावर ठरत असतो. मी मनापासून शिंदेंचे आणि शिवसेनेचे अभिनंदन करतो,' असंही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात जाणार? या प्रश्नावर फडणवीस म्हणतात, 'मी यापूर्वीच बोललो होतो. जर निर्णय त्यांच्या बाजूने आला असता, तर निकाल फेअर आणि आमच्या बाजूने आला असता तर दबावतंत्राचा वापर. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या. माझं स्पष्ट मत आहे की, देशात न्याय, संविधान आहे. त्याच्या अंतर्गत निर्णय आलाय. बाकी त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोर्टा जावं,' असंही ते म्हणाले.