मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे, तर शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयावर मंत्री शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी संवाद साधताना शंभुराज देसाई म्हणाले की, 'आज खऱ्या सत्याचा विजय झाला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिलाय. धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव आम्हाला मिळाले. आमची बाजू सत्याची आणि न्यायाची आहे, त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागला. आम्ही नियमबाह्य काहीच केले नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. आज अखेर आम्हाला न्याय मिळाला. बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्या बाजूने आहेत..'
तर, उदय सामंत म्हणतात की, 'सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की, आम्हीच खरा पक्ष आहोत. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आम्ही निघालो होतो. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार असायला हवे आणि कोणाबरोबर युती केली पाहिजे, हे बाळासाहेबांनीच तेव्हाच सांगितले होते. आता अखेर निवडणूक आयोगानेच जाहीर केले की, शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा आहे...हा सत्याचा विजय आहे.'