- ऑनलाइन लोकमत
शेतक-यांनी मांडले गा-हाणे : सेना आमदारांकडून जिल्ह्यातील पिकांची पाहणी
लातूर, दि. 2 - शिवसेनेला सत्तेची गरज नसून, केवळ जनतेची गरज आहे. शिवसेना शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, शेतक-यांच्या समस्या विधानसभेत मांडून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यामुळे शेतकºयांनी खचून जाऊ नये, असा विश्वास देत शिवसेनेचे एक राज्यमंत्री, खासदार व पाच आमदारांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, औसा, देवणी, चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्यात आमदार महोदयांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. औसा तालुक्यातील खरोसा, लामजना येथे आमदार सुरेश गोरे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी बागायती अनुदान मिळाले नसल्याचे गाºहाणे मांडले. घरकुल योजनेतील जागेची अट तसेच लक्ष्मी साखर कारखान्यात शेतकºयांचे अडकलेले ७ कोटींचे बिल देण्याचीही मागणी केली. दरम्यान, आमदार सुरेश गोरे म्हणाले, शिवसेनेला सत्तेची गरज नाही, जनतेची गरज आहे. म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही लातूर जिल्ह्यात दोन दिवस पीक परिस्थिती व दुष्काळातील उपाययोजनांची माहिती जाणून घेत आहोत. या माहितीचा अहवाल पक्ष प्रमुखांकडे सादर केला जाईल. शिवाय, जनतेच्या समस्या विधानसभेत मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चाकूर तालुक्यातील चापोली येथे खासदार अरविंद सावंत यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळी उपाययोजनांचा आढावाही त्यांनी घेतला. चापोली येथील लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारातील जलपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ज्या-ज्यावेळी शेतकºयांवर नैसर्गिक आपत्ती येथे, त्या-त्यावेळी शिवसेना धाऊन येते. मराठवाडा अद्यापही दुष्काळातून सावरलेला नाही. लातुरात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार, गटविकास अधिकाºयांना त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेशही दिले.
उदगीर तालुक्यात आमदार प्रसाद आबीटकर यांनी डिग्रस, करडखेल, पिंपरी, मोर्तळवाडी, नळगीर, डोंगरशेळकी आदी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकºयांनी पावसाअभावी सोयाबीन पीक वाळून गेल्याचे आमदार आबीटकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
देवणी तालुक्यात धनेगाव, जवळगा येथील पिकांची पाहणी आमदार अजय चौधरी यांनी केली. धनेगाव बॅरेजेसच्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांना मावेजा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी देवणी तहसील कार्यालयात अधिकारी-कर्मचाºयांची बैठक घेऊन योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या.
निलंगा तालुक्यात आमदार सुरेश गोरे यांनी मन्मथपूर, धानोरा शिवारातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. तेरणा नदीवर झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत काम झाले आहे. परंतु, गेट न बसविल्यामुळे पाणी वाहून गेले असल्याची तक्रार शेतकºयांनी केली. दरम्यान, यावेळी आमदार गोरे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना गेट बसविण्यासंदर्भात सूचना केल्या.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शिवपूर, आरी, आनंदवाडी, पांढरवाडी, सय्यद अंकुलगा आदी गावांतील पिकांची पाहणी केली. घरणी मध्यम प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली. आरी येथील पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने शेतकºयांच्या नुकसान झालेल्या शेतीचीही त्यांनी पाहणी केली.
जळकोटमध्ये आमदारांचे प्रतिनिधी...
जळकोटच्या पाहणीसाठी असलेले नियोजित आमदार शंभूराजे देसाई आले नसल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी पाटण पंचायत समितीचे सभापती विजय पवार, डी.आर. पाटील, जि.प. सदस्य जे.ई. पाटील, पं.स. सदस्य विजय पवार, नथुराम कुंभार यांनी तालुक्यातील घोणसी, गुत्ती, शिवाजी नगर तांडा, अतनूर, रामपूर तांडा, चिंचोली, रावणकोळा, हळद वाढोणा येथील पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर गुत्ती येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संग्राम सांगवे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
महसूल राज्यमंत्र्यांनी विश्रामगृहावरच ऐकले गा-हाणे...
महसूल राज्यमंत्री संजय राठोड लातूर व रेणापूर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार होते. मात्र त्यांचे औसा रोडवरील विश्रामगृहावर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यामुळे त्यांनी ६ वाजता गातेगाव येथील शेतकºयांचे गाºहाणे विश्रामगृहावरच ऐकूण घेतले. शनिवारी त्यांच्याकडून या दोन तालुक्यांतील पाहणी होणार आहे.