शिवसेना आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यातील हनुमान चालिसा प्रकरण चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. ते उद्या ९ वाजता मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार आहेत. या दोघांना घराबाहेर न पडण्याची पुरती मोर्चेबांधणी शिवसैनिकांनी केली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना बाहेर पडू न देण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या खार येथील घराबाहेर जमू लागले आहेत. या शिवसैनिकांनी आम्ही रात्रभर इथेच राहणार असून राणा मुंबई सोडून जात नाहीत तोवर रस्त्याच्या दोन्ही बाजुला खडा पहारा देणार असल्याचे सांगितले. तसेच राणा जोवर मुंबई बाहेर जात नाहीत, तोवर असाच पहारा देणार असल्याचे ते म्हणाले. मातोश्रीच्या रस्त्यावर एक पाय पुढे टाकून दाखवावे, आम्ही काय करू शकतो ते उद्या दाखवू, असा इशाराही या शिवसैनिकांनी दिला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केलं होतं. त्यावर शिवसेनेकडून राणा दाम्पत्यानं मुंबईत येऊन दाखवावं असं आव्हा न देण्यात आलं आहे. शिवसेनेचं आव्हान स्वीकारत राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झालं असून मुंबई पोलिसांनी त्यांना मातोश्री परिसरात न जाण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत राणा दाम्पत्यानं पत्रकार परिषद घेत कोणत्याही परिस्थितीत उद्या मातोश्रीवर जाणारच असा आक्रमक पवित्रा घेत हनुमान चालीसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत. तिथे मुंबईच्या महापौरांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महापौर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी या दोघांच्या मुर्खपणाकडे लक्ष देऊन आपला वेळ फुकट घालवू नका असा सल्ला दिल्याचे किशोरी पेडणेवर यांनी सांगितले.