मुंबई - मंत्रिमंडळात रामदास कदम, दिवाकर रावते असते तर अजित पवारांना खुले मैदान भेटलं नसतं. २ वर्ष उद्धव ठाकरे कोरोनामुळे घरात होते, त्यात अजित पवारांची प्रशासनावर चांगली पकड होती. राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यातून पाणी काढू, पण आता मी भावनाविवश होणार नाही असं विधान रामदास कदम यांनी केले आहे.
'माझा कट्टा'वर बोलताना रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कुणी केली? याचं आत्मपरिक्षण आदित्य ठाकरेंनी करावं. आपलं वय काय बोलता किती? थोडे भान ठेवा. वरळीतून जाऊन दाखवा, जाऊन दाखवलं, विधानभवनाची पायरी चढावी लागेल. विधानसभेत आले काय केले. ठाकरे आडनाव आहे जे बोलता ते करून दाखवा.आमच्यातील एकही आमदार मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर बोलणार नाही असं दीपक केसरकरांनी सांगितले. सगळ्यांना बोलता येते परंतु काही बोलायचं नाही हे ठरवलं आहे. हे शिंदेंकडील आमदारांनी समजून घेतलं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राष्ट्रवादीला सोडा आम्ही पुन्हा येतो अशी सर्व आमदारांची भूमिका होती. मात्र त्यानंतर याठिकाणाहून ज्या भाषा वापरण्यात आल्या त्यामुळे अनेक आमदार संतापले. संजय राऊतांनी तोंड बंद ठेवायला हवं असं त्यांना सांगितले. शिवसेनेसाठी उभं आयुष्य आम्ही इतरांच्या डोळ्यात पाणी काढलं. ५२ वर्ष शिवसेनेत काढली आता हकालपट्टी करतायेत. किती जणांची हकालपट्टी करणार आहात? जी गर्दी आदित्यसोबत दिसतेय उद्या आम्ही गेलो तरी तिथे गर्दी होईल. आम्ही पक्षात इतकी वर्ष उगाच काढली आहे का? असा सवाल रामदास कदमांनी केला आहे.
राज ठाकरेंच्या जवळचा होतो म्हणून राग होता का?शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर राज ठाकरेंसोबत होतो, आम्ही जवळचे मित्र होतो. राज ठाकरे शिवसेना सोडत होते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. ते पुण्याला गेले असताना मी मातोश्रीला गेलो, उद्धव ठाकरेंना आम्ही विचारले राज यांना थांबवण्याचा एकदा प्रयत्न करू का?, ते हो म्हणाले. परंतु हा प्रयत्न यशस्वी झाले नाही. राज ठाकरेंच्या जवळ होतो म्हणून माझ्यावर राग होता का असा प्रश्न आजही माझ्या मनात आहे.
त्याचसोबत २ दिवसांपूर्वी माझं आणि राज ठाकरेंशी फोनवरून बोलणं झालं. चहा प्यायला या असं ते म्हणालेत, मी गेलो तर त्यांच्या पोटात काय ते ओठांवर काढेन. राज यांनी माझ्यासोबत थांबावं, बाळासाहेबांच्या विचारांशी कायम असावं. शरद पवारांसोबत जाऊ नये. आमची मैत्री कायम आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच माझा मुलगा एकनाथ शिंदेसोबत आहे तो कुठल्या पक्षात जाणार नाही. अशी वेळ आली तर मी मुलाला राजीनामा द्यायला लावेन असंही रामदास कदमांनी सांगितले.
मुंबईत मराठी टक्का कमी का झाला?२५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. २५ वर्षापूर्वी किती मराठी माणूस शिल्लक होता आणि आता किती आहे? मराठी टक्का कमी झाला. आम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचं उत्तर आमच्यासह द्यायला हवं. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना होती. महापालिकेच्या कामात आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे.