Eknath Shinde vs NCP: राज्यातील सत्तासंघर्ष आता खूपत तीव्र होताना दिसू लागला आहे. सोमवारपासून शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदारांचा एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. पक्षातील सुमारे ३८ नाराज आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापना करावी अशी विनंती हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करत आहेत. याच दरम्यान, सोमवारपासून हे सर्व आमदार आधी सुरतमध्ये आणि नंतर गुवाहाटीमध्ये फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहत आहेत. या आमदारांचा एका दिवशीचा खर्च कोटींमध्ये असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आर्थिक बाबी लक्षात घेता काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी हे खरे आहे का? है पैसे कुणी दिले? शिवसेना बंडखोर आमदारांचे सुरत आणि गुवाहाटी येथील हॉटेलची बिले कोण भरत आहेत? स्पाईस जेटच्या विशेष विमानाचे बिल कुणी भरले? अशी प्रश्नावलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्वीट करत उपस्थित केली. तसेच, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली सुरू आहेत असे दिसत आहे त्या ठिकाणी आयकर विभाग आणि ईडीने छापे टाकल्यास काळ्या पैशाचे स्रोत उघडकीस येतील, असेही महेश तपासे यांनी आपल्या भूमिकेत लिहिले.
आमदारांच्या सुरक्षेवरून राजकारण?
राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पण एकनाथ शिंदेंच्या या ट्विटनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही स्पष्टीकरण दिलं. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.