Eknath Shinde Shivsena Revolt: शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार आणि फ्लोअर टेस्टसाठी हजर राहणार अशी माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील राजकीय संकट लवकर टळू दे असं मागणं देवीकडे मागितलं. त्यानंतर त्यांनी उद्या मुंबईत येण्याबाबत वक्तव्य केले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४ आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री यांना विनंती केली होती. त्यानंतर शिंदे यांनी दर्शन घेऊन झाल्यानंतर उद्या सर्व जण मुंबईत येणार असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. राज्यात कमालीची अस्थिरता आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा जावा केला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी विरोधी पक्षाने केली. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल यांनी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.