नवी दिल्ली - सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी (3 मार्च) अचानक जाहीर केला. मात्र त्यानंतर मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
'पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण झाला. तथापि याच हत्याराला मोदींनी नाटय़मय धार लावली हे दुसऱ्या ट्विटमधून पुढे आले. मोदी यांची ही नाटय़छटा काही तास देशभरात रंगली. शेवटी सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच!' असं म्हणत शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे भाजपच्या सायबर फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ आहे असं म्हणत मोदींवर टीका करण्यात आली आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
- आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटय़छटा सादर करतील याचा नेम नाही. मोदी यांनी लागोपाठ दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळय़ा ट्विटमुळे असेच नाटय़ निर्माण झाले. पण नंतर हा सस्पेन्स खुद्द मोदींनीच संपुष्टात आणला.
- मोदी यांनी सोमवारी अचानक जाहीर केले की, ''सोच रहा हूं इस रविवार से सोशल मीडिया छोड दूं!'' सोशल मीडिया म्हणजे समाजमाध्यमांचा त्याग करण्याच्या त्यांच्या घोषणेने मोदीभक्तांच्या छातीत कळा वगैरे आल्या. पण काही तासांच्या या वेदना मोदींच्या दुसऱ्या ट्विटनंतर कमी झाल्या.
- 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आपले सोशल मीडियावरील अकांऊट एका दिवसासाठी महिलांना समर्पित करण्याची घोषणा करून मोदींनी आपल्याच पहिल्या ट्विटमधील हवा काढून घेतली आणि मोदी सोशल मीडियातून संन्यास घेणार नाहीत हे स्पष्ट झाले.
- लोक राजकारणातून संन्यास घेतात, कामधंद्यातून बाजूला होतात, पडद्यावरून आणि रंगमंचावरून नट मंडळी तिसरी घंटा वाजवीत एक्झिट घेतात, पण आपले पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरूनच स्वतःला दूर करण्याचे सूतोवाच केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मात्र बुचकळय़ात टाकणाऱ्या या नाटकाचा 'अंक दुसरा, प्रवेश दुसरा' मंगळवारी समोर आला आणि या नाटय़ावर पडदा पडला.
- वास्तविक 'सोशल मीडिया' हा तर भारतीय जनता पक्षाचा पंचप्राणच! 2014 चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली.
- अमित शहा यांचे एक विधान त्या दृष्टीने महत्त्वाचे, ''जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात तेव्हा विजय फक्त भाजपचाच होतो.'' शहा यांचे हे विधान दखलपात्र आहे. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला.
- नाटय़ पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले असेच आता म्हणावे लागेल. आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत.
- साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर 'फॉलो' करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूटय़ूबच्या माध्यमातून मोदी रोज कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच.
- मोदींच्या दोन्ही ट्विटवरून आता सोशल मीडियातही विनोदनिर्मिती सुरू झाली आहे. 'मोदी एकवेळ पंतप्रधानपद सोडतील, पण सोशल मीडिया नाही' अशी मल्लीनाथी आता सुरू आहे. यातील गमतीचा भाग सोडला तरी इतके 'फॅन फॉलोइंग' सोडून मोदींनी सोशल मीडियातून संन्यास घेणे म्हणजे भांडवलशहा अमेरिकेने कम्युनिस्टांचा साम्यवाद स्वीकारण्यासारखेच होते!
- सोशल मीडियाचा वापर हा एक छंद आहे. स्त्रियांना नटण्या-मुरडण्याची हौस असते. कुणाला छानछोकीची हौस असते, कुणाला उत्तम खाण्यापिण्यात आनंद मिळतो. तसा मोदी यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात आनंद मिळत असतो. आपलीच चर्चा सदैव व्हावी व आपल्यावरच कॅमेऱ्यांचा झोत राहावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो. सोशल मीडियावर यासाठीच ते सक्रिय राहतात. त्यामुळेच सोशल मीडियापासून दूर होण्याच्या काही तासांच्या अफवेवरील धूळ झटकून मोदींनी उलट जागतिक महिला दिनी देशातील निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी नवी शक्कल लढवली.
- 8 मार्च रोजी आपल्याला प्रेरणा देणाऱया महिलांचा व्हिडीओ पोस्ट करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आता केले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा त्याग करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला आहे. पण एक मात्र खरे की सोशल मीडिया म्हणजे समाजाचे दिशादर्शक नाही.
- भारतीय जनता पक्षाच्या सायबर योद्धय़ांनी झारखंड गमावले. दिल्लीत मोठय़ा सायबर फौजा उतरवूनही भाजपचा पराभव झाला. 'सीएए'ला विरोध करणारे कसे देशद्रोही आहेत असा प्रचार सोशल मीडियावर करूनही लोकांनी जुमानले नाही. सोशल मीडियावरचा लोकांचा विश्वास उडत चालल्याचे हे लक्षण आहे. तथापि मोदींच्या मनावरील सोशल मीडियाचा प्रभाव मात्र कायम आहे.
- 2014 मध्ये मोदी सायबर फौजांच्या रणभेरी वाद्यांसह मैदानात उतरले. या फौजांनी मनमोहन सिंग यांना 'मौनीबाबा', तर राहुल गांधींना 'पप्पू' ठरवले. त्यांची खिल्ली उडवली. आता त्याच सोशल मीडियावर मोदी-शहांना त्यांच्याच भाषेत चोख 'पलटवार' मिळत आहे. सायबर फौजांचे हत्यार अलीकडे भाजपवरच उलटत आहे. त्या व्यथेतून पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण झाला. तथापि याच हत्याराला मोदींनी नाटय़मय धार लावली हे दुसऱ्या ट्विटमधून पुढे आले. मोदी यांची ही नाटय़छटा काही तास देशभरात रंगली. शेवटी सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच!
- वास्तविक सोशल मीडियाचा सकारात्मक वापरही करता येतो हे अलीकडे रतन टाटांसारख्या लोकांनी दाखवून दिले. एका सफाई कामगाराच्या मुलाची व्यथा टाटा यांनी सोशल मीडियातून लोकांसमोर आणली. सोशल मीडियात असे कामही होते. त्यामुळे सोशल मीडिया सोडण्याच्या काही तासांच्या अफवेऐवजी मोदी यांनी टाटांचा मार्ग स्वीकारावा. पण तसे केले तर त्यांच्या सायबर योद्धय़ांचे काय होईल? फौजा तर शेवटी पोटावरच चालतात आणि आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे त्या फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप
कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क
आधी मराठा, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण, मंत्र्यांमध्ये मात्र विसंवादी सूर कशासाठी?
गिरणी कामगारांच्या घरांचा भार सरकारी तिजोरीवर?