मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (ShivSena Sanjay Raut) यांना तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने आता ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. यानंतर आता ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"जी काही कारवाई व्हायची ते होऊद्या. मी काही घाबरत नाही. राजकीय सुडाने चाललेला खेळ आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, निधड्या छातीने आम्ही सामोर जातो. राजकीय सुडाने या कारवाया सुरू आहेत. त्यांना बळ मिळणार नाही. अशा कारवाईच्या भीतीने काही लोक पक्ष सोडतात, संजय राऊत त्यातले नाहीत. मरेन पण झुकणार नाही, पक्ष सोडणार नाहीय, शिवसेना सोडणार नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"कोणतेही कागदपत्र माझ्याकडे सापडले नाहीत. पत्रा चाळ कुठे हे मला माहीत नाही, माझा आवाज बंद करायचा, शिवसेनेला संपवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. शिवसैनिकांना लढण्यासाठी बळ मिळणार असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे. करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही. माझ्यावर कसा दबाब आणला जातो, खोट्या प्रकरणात कसं अडकवलं जाईल हे सांगणारं एक पत्र व्यंकय्या नायडू यांना सहा महिन्यांआधी दिल होतं. भविष्यात मी आत असेन की बाहेर असेन माहीत नाही... याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल धुलाई काय असते" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया
ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. ते मला अटक करत आहेत, मी अटक व्हायला तयार आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'