मुंबई: 'शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या कुटुंबाने एका वाईन व्यावसायिकासोबत भागीदारी केली आहे,' असा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. आता त्यांच्या या दाव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. 'सोमय्यांचा मुलगा काय चणे-शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?',असा खोचक सवाल राऊतांनी केला.
'भाजप नेत्यांची मुले केळी विकतात का?'संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली. 'आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी आमच्या नावावर असेल, तर मी सोमय्यांच्या नावावर करुन द्यायला तयार आहे. कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?' असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
'संजय राऊतांच्या कुटुंबाची वाईन कंपनीसोबत पार्टनरशिप'; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
'चोऱ्या करण्यापेक्षा कष्ट करणे चांगले'राऊत पुढे म्हणाले की, 'एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? कुणी काही व्यवसाय करत असेल, कुणी काम करत असेल, बँकांना लुबाडणे आणि चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा काबाड-कष्ट करणे कधीही चांगले. भाजपचे लोकं काहीही बोलतात. मला शरद पवारांचा फोन होता, तेही हसत होते. आमच्या कुटुंबाच्या काही वायनऱ्या असतील तर सोमय्या यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे', असं राऊत म्हणाले.
'आमची मुले ड्रग्स विकत नाहीत'ते पुढे म्हणाले की, 'एखाद्या कंपनीत संचालक असणं हा काय गुन्हा आहे का ? महाराष्ट्रातील राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुले काय करतात ते पाहा. आमची मुले ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.