मुंबई - शिवसेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्याबद्दल दररोज वेगवेगळी विधाने समोर येत आहेत. त्यातच ते सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा असून त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही होते. त्यामुळे खोतकरांनी शिंदेंसोबत हातमिळवणी केली का याची दिवसभर चर्चा होती; परंतु खोतकरांकडून ठोस प्रतिक्रिया मिळू न शकल्याने याबद्दल खोतकरांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
"जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी स्पष्टच म्हटलं आहे. तसेच "दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं सांगितलं आहे.
"लोकसभा निवडणुकीत उभा राहीन आणि दानवेंना घरी बसवेल असं खोतकर म्हणाले होते. खोतकर यांचे काही शब्द सांगू शकत नाही. शिवसेनेच्या व्यासपीठावरील खोतकर यांची तुम्ही भाषणं ऐकली तर मला वाटतं काही तरी गैरसमज झाला असावा. खोतकर शिवसेनेत आहेत. ते स्वत:हून सांगत नाहीत, तोपर्यंत ते सेनेत आहेत" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात खोतकर हे दिल्लीत होते, त्यावेळी महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यावेळी समोरासमोर भेट झाल्यावर आपण मुख्यमंत्री शिंदेंना नमस्कार केला. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे खोतकरांनी सांगून आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले. परंतु रविवारी सायंकाळच्या विमानाने खोतकरांनी दिल्ली गाठली.
दानवे -खोतकर यांच्यात समेट
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत अर्जुन खोतकर आणि आमच्यात चर्चा झाल्याचे मान्य करून राजकीय वाद मिटवून सोबत राहण्याचे सांगितले. ते आपण मान्य केल्याचे दानवे यांनी सांगितले. खोतकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली नाही.
...तोपर्यंत केवळ चर्चाच
याबाबत खोतकरांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. याबाबत जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी खोतकरांच्या एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या वृत्ताचा इन्कार करून जोपर्यंत अर्जुन खोतकर हे स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत या केवळ चर्चाच समजा, असे सांगितले.