मुंबई - बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी सुरुवातीला नाम फलकाला काळे फासले, त्यानंतर आमदार तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"हा महाराष्ट्रातील जनतेचा राग आहे, महाराष्ट्रात असं चालत नाही आणि राग हा असलाच पाहिजे. ही शिवसेनेची आग आहे आणि ही आग आम्ही कधीही विझू देणार नाही. राख नाही झाली पाहिजे. अग्नी तेवत ठेवण्यासाठी जी काही समिधा लागेल, ती ओतत राहिली पाहिजे" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही आमच्या आमदारांचे अपहरण कराल, त्यांना सुरक्षा द्याल आणि आम्ही आमचा राग काढणार नाही? असं होऊ शकतं का? आम्ही नामर्द आहोत का?, आम्ही नामर्द नाही" असंही म्हटलं आहे.
"सत्ता आणि बहुमत येत-जात असतं, पक्षावर कब्जा केलात तर तलवारीला उत्तर तलवारीने देऊ"
जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. सत्ता आणि बहुमत येत-जात असतं. ठाकरे या नावाशी खरी शिवसेना जोडलेली असल्याचं संजय राऊत म्हणाले. यासोबतच शिंदे, राणे, भुजबळ हे लोक येत राहतात आणि येत राहतील. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं कोणी म्हणत असेल तर भक्ती करा. पक्षावर कब्जा करू नका, जर कब्जा केलात तर तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असं राऊत यांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्यातील आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. असे असताना दक्षिण उपनगरातील शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष आज उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.एकनाथ शिंदे आणि पक्षात फुट पाडण्यात आमदार तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. माजी नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलाण धनावडे, सुनिल पायगुडे, परेश खडके व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.