मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "शिवसेनेसोबतची युती आमची ऐतिहासिक चूक होती" असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्याचसंदर्भात पत्रकारांनी राऊत यांना मुनगंटीवारांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राऊत यांनी "मन भरकटलं, की माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात, भाजपाच्या नेत्यांना केदारनाथला जाऊन महिनाभर शांतपणे बसण्याची गरज आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"राजकारणामध्ये आता विरोधीपक्ष ज्या पद्धतीने भरकटला आहे, ते पाहता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार आहात?" असा खोचक सवाल संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी विचारला आहे. यासोबतच "सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतील आणि बाहेरची भाषणं मी पाहतो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचं ते ठरवलंय" असं देखील म्हटलं आहे.
"भाजपाच्या नेत्यांना केदारनाथला जाऊन महिनाभर शांतपणे बसण्याची गरज"
संजय राऊत यांनी "कधी राष्ट्रवादीबरोबर तुम्हाला जावसं वाटतंय. कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्याचं म्हणता. कधी अजून काय म्हणता. या महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना केदारनाथला जाऊन महिनाभर शांतपणे बसण्याची गरज आहे. त्यांची डोकी थंड झाली, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही, बरी नाही. त्यांचं मनस्वास्थ्य ठीक व्हावं, म्हणून मी या नवीन वर्षात ईश्वराकडे प्रार्थना करतो" असं म्हटलं आहे.