मुंबई - शिवसेनेत झालेलं अभूतपूर्व बंड, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ओढवलेली नामुष्की, पक्षाच्या अस्तित्वावर आलेलं संकट या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एक प्रदीर्घ मुलाखत देत सर्व प्रश्नांची उत्तरं देत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
"बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांनी आता शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच "ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. चुका सगळीकडेच होत असतात, कुटुंबातही होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंब कमकुवत करण्याचा काहींचा मनसुबा आहे" असं म्हटलं आहे. यासोबतच "एकनाथ शिंदेंचा 2014 साली भाजपासोबत जाण्यास विरोध होता. लालसा वाढल्यानेच शिवसेनेवर घाव घातला" अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
आपण शिवसेनेतून बाहेर पडलो नसून शिवसेना ही आपलीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता" असे उद्धव ठाकरे म्हणाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं.
"भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय" असा सवालही त्यांनी केला.