मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेनेदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता. त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड" असं म्हणत निशाणा साधला आहे. कालच्या सभेतून एक गोष्ट कळली, ती म्हणजे अक्कलदाढ उशिरा येते, अशा शब्दांत राऊत यांनी राज यांना सणसणीत टोला हाणला. शिवतीर्थावरच्या टाळ्या स्पॉन्सर्ड होत्या. शिवाजी पार्कवर भाजपचा भोंगा होता. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे ते आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे, अशी टीका राऊतांनी केली.
मुख्यमंत्री (CM) ठाकरे आपलं काम करत आहेत. काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. अशी ऐतिहासिक कार्य मुख्यमंत्र्यांच्या हातून घडत आहेत. बोलायचंच असेल तर त्याच्यावर बोला, असंही संजय राऊत म्हणाले. तुमच्या भोंग्यांचं काय करायचं. त्यांच्या भोंग्यांच काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अस म्हणता. अहो त्याच शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होतात. सल्ला मसलत करायला. कशाकरिता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं. विशेष म्हणजे कालच्या कार्यक्रमाच्या टाळ्याही स्पान्सर्ड आहेत असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
काल मुंबईत दिवसभरात मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकोपयोगी प्रकल्पांची उद्घाटनं केली. मेट्रोचे दोन टप्पे सुरू केले. मराठी भाषा भवनाच्या कामाचा शुभारंभ केला. मात्र त्याबद्दल राज यांनी त्यांच्या भाषणात चकार शब्द काढला नाही. जातीयवादासाठी त्यांनी शरद पवारांना जबाबदार धरलं. त्याच पवारांच्या चरणांजवळ राज जात होते. सल्लामसलत करत होते, याची आठवण राऊत यांनी करून दिली.
राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ते पुन्हा मोदींचं कौतुक करत आहेत. भाजपच्या जवळपास जाणारी भूमिका घेत आहेत. उद्या ते काय करतील, काय म्हणतील, ते मला सांगता येणार नाही, अशा शब्दांत पवारांनी राज यांना लक्ष्य केलं.