नाशिक – गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून राजकारण सुरू झालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालिसा लावू असा इशारा सरकारला दिला आहे. त्यावरून शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले आहे त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हनुमान चालीसा पाठ नाही असं म्हणत राऊतांनी मनसे, भाजपाला हनुमान चालीसा कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं आव्हान दिले. मात्र राऊतांनीच कॅमेऱ्यासमोर मोठी चूक केली.
संजय राऊतांनी(Shivsena Sanjay Raut) विरोधकांना आव्हान देत म्हटलं की, हनुमानाचे खरे भक्त असाल तर हनुमान चालिसा पाठ असायला पाहिजे. हनुमान चालिसातील पहिल्या २ ओळीही पाठ नाहीत. राष्ट्रगीत म्हणता येत नाही त्यांना हनुमान चालीसा कुठून येणार असं सांगितले? असं त्यांनी सांगितले. मात्र त्यावेळी कॅमेऱ्यासमोर हनुमान चालिसा पाठ असल्याचं सांगत संजय राऊत यांनी थेट मारूती स्त्रोत म्हणून दाखवलं. “भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारूती, वनारी अंजनीसुता, रामदूता प्रभंजना, महाबळी, प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दु:खहारी दूत वैष्णव गायका” असं म्हणत संजय राऊतांनी हनुमान चालीसा आमची पाठ आहे. तुम्ही यातील २ वाक्य म्हणा, आम्ही ढोंग करत नाही असं विधान त्यांनी केले.
त्यावेळी पत्रकारांनी आपण जे म्हणून दाखवलं ते मारूती स्त्रोत आहे असं सांगितले तेव्हा स्त्रोत असेल किंवा चालिसा असेल आम्ही हनुमान भक्त आहोत. मी रोज स्त्रोत वाचतो. चालीसा पठणही करतो. तेही वाचून दाखवेन. पण मी जे म्हणतोय ते कथाकथित हनुमान भक्तांनी वाचून दाखवावं असं म्हणत वेळ मारून नेली. तसेच भोंगे, हनुमान चालिसा याबाबत घाणेरडे राजकारण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोल्हापूरच्या जनतेने भोंगे खाली उतरवले आहेत अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र सोडलं.
राज ठाकरेंवर बोचरी टीका
महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत. सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत. भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा. त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे असाही आरोप करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर (MNS Raj Thackeray) नाव न घेता बोचरी टीका केली आहे.