मुंबई - पूजा चव्हाण (Pooja Chavan Case) मृत्यूप्रकरणावरुन आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील (Shivsena) विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच थेट राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारची नामुष्की झाल्यानं शिवसेनेनं राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट केलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं असून यामध्ये संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं ट्विट केलं आहे. राऊत यांनी "सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन" असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी संजय राठोड यांना एकप्रकारचा इशारा दिल्याचं म्हटलं जात असून या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच"
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपाला संजय राऊत यांनी याआधी टोला लगावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत, ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राठोड प्रकरणात भाजपाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि विधिमंडळाचे अधिवेशन चालवू न देण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले की, आपण जेव्हा काही भूमिका घेतो, आक्रमक, प्रखर. तेव्हा मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील तेव्हा काही भूमिका असते. अधिवेशन व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटते. अधिवेशन झाले पाहिजे. त्यामधून प्रश्न मांडले गेले पाहिजेत. अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कोविड संदर्भात, विरोधकांना जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, तेही करू शकतात. पण अधिवेश होऊ द्या, गोंधळ नको. पण अधिवेशन होऊच द्यायचं नाही. लोकशाही विरोधी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारची नामुष्की झाल्यानं शिवसेनेनं राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन भाजपनेही महाविकास आघाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील, असं म्हणून संजय राठोडांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते.
भाजपचा आक्रमक पवित्रा
राज्याच्या अर्थसंकप्लीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली.