स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. याच दरम्यान शिंदे गटाने कामराला जशाच तसं उत्तर दिलं आहे.
"जनता की नजरसे तुम देखो, ठाणे का टायगर नजर आये" असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे. उबाठा आणि कुणाल कामराला त्याच्याच स्टाईलमध्ये शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी हे उत्तर दिलं आहे. "चेहरेपे दाढी, आखोमे शोले, तांडव करे जैसे शंभू भोले, उनकी दहाड सुनकर ये चुहे. बिलमे जाके छूप जाये, जनता की नजरसे तुम देखो" असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरा प्रकरणावर भाष्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. "कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने दाखवून दिलं आहे. कोणाकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या बद्दल जनतेच्या मनात आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही."
"हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाचे पुस्तक दाखवत आहे. त्यांनी जर ते वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.