मुंबई - देशात विविध मुद्द्यांवरून सध्या राजकारण तापलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आता पुन्हा एकदा मोदी सरकार, भाजपा आणि शिंदे गटांवर निशाणा साधण्यात आला आहे. "मोदींनी शिंदे, केसरकर, सामंतांना काश्मीरमध्ये न्यायला हवं होतं" असं म्हणत शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. तसेच काश्मीरचा ध्वज फडकवून देशालाच आव्हान देणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना केंद्र सरकारचे शेपूटघाले धोरण का? याचे उत्तर देशाला मिळायला हवे असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाकने गिळलेल्या आमच्या कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे होते. सोबत महाराष्ट्रातील नवमर्द शिंदे, केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे होते. भाजपच्या नादास लागून शिवसेनेत फूट पाडल्यापासून या 'नवमर्द' गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या सुरसुरी फुटीर गटासह पाकव्याप्त कश्मीरात पाऊल ठेवून देशासमोर आदर्श निर्माण करणे गरजेचं आहे" असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
"चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 80 हजार वर्ग फूट जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य धन्य मानीत आहोत."
"चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे" असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.