एकनाथ शिंदेंचे बंड आणि शिवसेनेचे बुडते जहाज पाहून आता अपक्षांनी देखील पलटी मारण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर देखील होते.
शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा देखील सहभाग आहे. जैन यांनी कालच फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या.
गीता जैन यांनी सुमारे अर्धातास फडवीसांशी चर्चा केली. त्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मध्यरात्रीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांचा जथ्था सूरतहून गुवाहाटीला हलविला तेव्हा बच्चू कडू देखील त्यांच्यासोबत होते. याच बच्चू कडूंनी पुढील दोन वर्षांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रहारचा असेल असे विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी म्हटले होते. तसेच आज सकाळी शिवसेनेचे ३३ आणि अपक्ष ३ असे ३६ आमदार आमच्यासोबत आहेत असे म्हणाले होते. तर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार आणि १० आमदार येत असल्याचे म्हटले होते.