पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात सातत्याने लढा उभारणाऱ्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी यू टर्न घेतला आहे. संजय राठोड प्रकरण आता संपवूया, त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय, प्रश्न आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात माझा लढा सुरू राहील, असे मोठे विधान भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केले. यानंतर आता ठाकरे गटाने चित्रा वाघ आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. "भावना गवळी जशा मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच संजय राठोड यांची माफी मागावी असंही म्हटलं आहे. "माणूस भाजपाकडे गेला की प्रकरण संपतं, फाईल बंद होते, विषय संपून जातो. पण भाजपाला सोडून दुसरीकडे गेलात की प्रकरण चालू होतं. फाईल उघडल्या जातात. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या या फक्त देवेंद्रजींनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करतात."
"चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची माफी मागावी"
"कधी आंदोलन करायचं, कधी थांबवायचं हे राजकीय हेतू पुरस्कृत असतं. पूजा चव्हाणसारख्या मुलीला न्याय देण्यासाठी नसतं. चित्रा वाघ यांनी विषय संपवला कसा?, क्लीन चिट कोणत्या आधारे दिली? त्यामुळे मला वाटतं त्यांनी संजय राठोड यांची माफी मागितली पाहिजे. जशा आमच्या भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं आता चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हायला हरकत नाही" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहेत.
चित्रा वाघ या अमरावती येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेत संजय राठोड यांच्यासंदर्भात भूमिका मांडली. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनाही विचारा, असा सवाल चित्रा वाघ यांनी माध्यमांना केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"