Shivsena Symbol and Name, Election Commission: राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विषयावर आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे नव्या नावांचे आणि चिन्हाचे पर्याय दिले होते. त्यापैकी, उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' असे नाव देण्यात आले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच या संबधी निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. याशिवाय, उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाने दावा केलेल्या तीनही पक्षचिन्हांवर निवडणूक आयोगाने नकारघंटा दिली. त्यांनी आता उद्या दुपारपर्यंत, नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे.
ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!
निवडणूक आयोगाकडे प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर शनिवारी निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात होता. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे ३ चिन्हे आणि ३ नावांचे पर्याय दिले. त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला नाव आणि चिन्हे दोन्हीबाबत हिरवा कंदील मिळाला. ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने आणि मशाल या चिन्हावर निवडणूक लढेल. पण शिंदे गटाने दिलेली तीनही चिन्हे निवडणूक आयोगाने बाद ठरवत, ११ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालेले शिंदे गट कोणत्या चिन्हाचा पर्याय देतो, त्याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.