राजू इनामदार
पुणे : ‘भारतीय जनता पार्टीची फिकिर करू नका, आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली गरज आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा’ असा आदेश पक्षनेतृत्वाने दिल्यामुळे शिवसेनेने विधानसभेची तयारी करण्यास पुण्यातून सुरूवात केली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय काहीजणांना तयार राहण्यास सांगण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुण्यात २१ जुलै रोजी दौरा झाला होता. त्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघाचा आढावा घेतला. भाजपाबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यात काळजी व्यक्त केली. आपलाच हात धरून मोठे झाले व आता आपल्यालाच बाजूला सरकवत आहे अशीच बहुसंख्य शिवसैनिकांची भावना होती. त्याची दखल घेत ठाकरे यांनी भाजपाची काळजी करण्याचे कारण नाही, त्यांचे वर्चस्व असेल तर ते आपल्यामुळे मोडीत निघणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
पुण्यातील आठही मतदार संघात त्यांचेच आमदार आहेत. त्यांचे वर्चस्व त्यांना अबाधीत ठेवायचे असेल तर आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली गरज आहे असे मत ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केले. त्यामुळे तुम्ही अगदी आतापासूनच मतदारसंघ बांधायला सुरूवात करा, पकड पक्की करा, युती होणार नाहीच पण झाली तरी आपली ताकद त्यांना दिसायलाच हवी, ती असेल तर त्यांना झटकून टाकणे फार अवघड नाही असा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी पदाधिकाºयांना उत्साहित केले. त्याचाच परिणाम म्हणून आता पुण्यातील शिवसेनेने आक्रमक धोरण घेत भाजपावर थेट टिका करणे सुरू केले आहे. त्याच बैठकीत काहीजणांनी अचानक निर्णय झाला तर तयारीला वेळ मिळत नाही असा सूर लावला. त्याचीही ठाकरे यांनी दखल घेतली व त्यामुळेच तुम्ही आतापसूनच तयारीला लागा असे सांगितले. काहीजणांची नावेही त्यांनी त्याच बैठकीत निश्चित करून दिली असल्याची चर्चा आहे. हेच उमेदवार असतील असे नाही, मात्र त्यांनी त्यादृष्टिने मतदारसंघात कामे सुरू करावीत असे आदेश त्यांनी संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून त्यांना दिले असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत बाहेरून येणाऱ्यांना लगेचच उमेदवारी दिली जात नाही. पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जाणार नाही, तसेच उगीचच जुने आहेत म्हणून लगेचच उमेदवारीही दिली जाणार नाही असे ठाकरे यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.
शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, रमेश बापू कोंडे, माजी आमदार चंद्रकात मोकाटे, महादेव बाबर यांना पुण्यातून तयारी करण्यास सांगण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्यातील काहींनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका, कार्यक्रम घेण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली आहे. फ्लेक्सच्या माध्यमातूनही त्यांनी मतदारसंघात मिरवणे सुरू केल्याचे चित्र दिसते आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला २१ लाख मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला १२ लाख तर शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकांची म्हणजे ८ लाख ५० हजार मते मिळाली आहेत. काँग्रेस थेट चौथ्या क्रमाकांवर होती. त्यांना ६ लाख ५० हजार मते मिळाली होती. चार सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यामुळे या मतसंख्येला चारने भागले तर शिवसेनेची साधारण २ लाख ते सव्वादोन लाख मते पुणे शहरात पक्की असल्याचे दिसते आहे. प्रयत्न केला तर यात चांगली वाढ होऊ शकते असे पक्षनेतृत्त्वाने संभाव्य उमेदवारांच्या मनावर ठसवले आहे.
लोकसभाही स्वबळावरच लढवायची अशीच चर्चा त्या बैठकीत झाली. माजी शहरप्रमुख विनायक निम्हण यांची त्याच वेळी काँग्रेसप्रवेशाची बोलणी सुरू होती, मात्र हा प्रवेश लांबणीवर पडला आहे. मात्र निम्हण पक्षात सक्रिय नसल्याने त्यांच्याऐवजी विधानपरिषदेच्या आमदार डॉ. निलम गोºहे यांच्या नावाची लोकसभेच्या उमेदवार म्हणून चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.