Shivaji Adhalrao NCP ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. आढळराव पाटील हे यंदा शिरूरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मागील तब्बल दोन दशके राष्ट्रवादीसोबत संघर्ष करणाऱ्या आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आढळराव यांचा जोरदार समाचार घेतला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले," असा टोला दानवे यांनी लगावला आहे. या टीकेला आढळराव पाटलांकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.
आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीवर केले होते आरोप
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केल्यानंतर काही महिन्यांतच शिवाजीराव आढळराव यांनी आघाडीविरोधात भूमिका घेतली होती. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देत शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आढळराव पाटलांकडून करण्यात आला होता. तसंच २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आढळराव यांनी शिंदेंना साथ देत आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं. मात्र तेच शिवाजीराव आढळराव हे आता उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत गेल्याने ठाकरेंची शिवसेना आगामी काळातही त्यांच्याविरोधात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. आढळराव पाटलांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.