मुंबई - मी कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील. प्रकाश आंबेडकर माझ्या पक्षाचे नेते नाहीत. पण मी त्यांचा आदर करतो. मी मानतो. आंबेडकरांना आम्ही मानतो. जितके बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात भिनलेत तितकेच आमच्यातही आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर काही टीका-टिप्पणी करायची नाही. ते आमचे सहकारी आहेत. शिवसेनेसोबत त्यांची युती झालीय आम्ही त्यांचा आदर करतो. जेव्हा युती नव्हती तेव्हाही आदर करतच होतो. फक्त महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नयेत. यात कुणाला राग येऊ नये असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, माझे व्यक्तिगत वक्तव्य नाही. संजय राऊत व्यक्तिगत बोलत नाहीत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता, पक्षाचा नेता, उद्धव ठाकरेंचा सहकारी आहे. त्यामुळे मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही. महाविकास आघाडी टिकावी आणि प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांविषयी काळजीपूर्वक बोलावी आणि भूमिका घ्याव्यात असं सगळ्यांचे मत आहे. माझे शरद पवारांसोबत बोलणे झाले आहे. पवारांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे आणि तो राहील असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मी कुठे म्हटलं माझा सल्ला ऐका. आमची महाविकास आघाडी आहे. ज्यांनी अडीच वर्ष महाराष्ट्रात योग्य प्रकारे सत्ता राबवली. त्यावर मी बोलतोय. मी वंचित बहुजन-शिवसेना युतीवर बोलत नाही. या महाविकास आघाडीचे शरद पवार नेते आहेत. देशात भाजपाविरोधात आघाडी उभी करायची असेल तर पवारांचे नेतृत्व आणि सल्ला महत्त्वाचा आहे इतकेच मी बोलतोय. भाजपाविरोधात जी भूमिका घ्यायची ती एका-दुसऱ्याची मक्तेदारी नसते. त्यात आम्हाला सगळे सोबत हवेत असंही राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी आम्ही अडीच वर्षापूर्वी जे बळ उभे केले. त्या एकीला कुठे तडा जाऊ नये ही आमची भूमिका आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्व होते म्हणून आम्ही अडीच वर्ष सत्तेत राहिलो. यापुढेही राहिलो असतो. पण भाजपानं सत्तेचा गैरवापर करून आमचा पक्ष फोडला. हे प्रकाश आंबेडकरांनाही मान्य आहे. आमच्या सगळ्यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे एकत्रित बसून आम्ही भविष्यात ठरवू असंही राऊत म्हणाले.